ती आणि मी
  तिचं  आणि  माझं  पूर्वी  फारसं  पटत  नसे . विळ्या  भोपळ्याचंच  नातं  म्हणा  ना ! पण  काही  उपाय  नव्हता . आम्हाला  एकत्र  राहणं  भाग  होतं . आमची  ओळख  तशी  फार  जुनी . म्हणजे  मी  जवळपास  जन्मल्यापासूनच  ओळखते  म्हणा  ना  तिला . कोणत्याही  नवीन  नात्यामध्ये  रुळायला  माणसाला  वेळ  लागतोच ! तसाच  वेळ  आम्हालाही  लागला . सुरवातीची  काही  वर्ष  फार  अवघड  होती . हळू  हळू  मतभेद  विरले . हे  व्हायला  चांगली  वीस  वर्ष  जावी  लागली . पण  आता  सगळं  ठीक  आहे . खरं  तर  आता  आमची  चांगली  मैत्री  झालीय . तुम्हाला  कळलंच  असेल  मी  कोणाबद्दल  म्हणतेय  ते ! माझ्या  आईबद्दल .   बराच  ओरडा  आणि  मार  खाल्लाय  मी  तिच्याकडून ! लहानपणी  आई  बद्दल  लिहिलेल्या  सगळ्या  कविता  खोटया  वाटायच्या . पुस्तकामधली  आई  प्रेम , करुणा , त्याग  , दया  यांचं  मूर्तिमंत  रूप  असायची . पण  प्रत्यक्ष  अनुभव  काही  निराळाच  निघाला . सगळी  पुस्तकं  आपली  दिशाभूल  करत  आहेत  असे  वाटे . तसं   तर  आपल्या  या  प्राणप्रिय  भारतभूमीवर    आई  वडीलांकडून  मुलांनी  मार  खाणं  फारसं  नवीन  नाही . पण  माझी  तक्रार ...