हॅपी बर्थडे पुलं
मुंबई मधल्या चाळीतील एक लहानसं घर. आजी ,आई, बाबा, ताई आणि एक छोटा भाऊ असं छोट कुटुंब. यात काही फारसं विशेष नाही. पण हा काळ आहे साधारण १९९९-२००० सालंचा. जवळपास सगळ्यांच्या घरी रंगीत टीव्ही आलेले होते. पण या घरात मात्र टीव्ही नव्हता. परवडत नव्हता म्हणून नाही. पण घरातल्या मुलांनी काय बघायचं याचा निर्णय घरातलं आई बाबांचं सेन्सॉर बोर्ड घ्यायचं! या घरात होती खूप सारी पुस्तकं . त्या छोट्याशा घरात अडचण वाटावी इतकी पुस्तकं ! आणि खूप साऱ्या कॅसेट्स . रोज संध्याकाळी बाबा कॅसेट्स लावायचे आणि घरातले सगळे मिळून त्या ऐकायचे. आणि त्यातली सगळ्यांची आवडती कॅसेट होती पुलंच्या 'असा मी असामी'ची. घरातल्या एक अक्षरही न वाचता येणाऱ्या आजीपासून ते सगळ्यात छोट्या नुकत्याच पहिलीत गेलेल्या सहा वर्षाच्या बाबूपर्यन्त सगळ्यांना पाठ होती ती रेकॉर्ड. ते घर माझं होत. आज इतकी वर्ष झाली तरी मला ती रेकॉर्ड पाठ आहे. अजूनही मला ती तितकीच आवडते.
पुलंची ही मोहिनी काही हटत नाही. खरंतर त्यांच्या पुस्तकात वर्णन केलेला काळ फार जुना. साधारण १९४०-४५ पासून ते १९६०-७० च्या दरम्यानचा. त्या काळातले बरेचसे शब्दही आता इतिहासजमा होऊ लागले आहेत. पण पुलंची पुस्तकं मात्र इतिहासजमा होत नाहीत. पुलंचं हे जन्मशताब्दी वर्ष. पुलंना जाऊनही इतकी वर्ष झाली. पण त्यांची पुस्तकं वाचणाऱ्यांना मात्र ते सतत त्यांच्या पुस्तकातून भेटत राहतात. जे कोणी पुलंची पुस्तकं वाचत असतील त्यांना आपणच काय ते त्यांचे सर्वात मोठे चाहते आहोत असं वाटत असत. मीसुद्धा त्याच गर्दीतील एक. म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या लेखनाबद्दल चार शब्द मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
पुलं हे विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विनोदात एक सहजता आहे. बाकीच्या प्रसिद्ध विनोदी लेखकांपेक्षा (उदाहरणार्थ चि वि जोशी, राम गणेश गडकरी इत्यादी ) पुलंचा विनोद खूप वेगळ्या धाटणीचा आहे. इतर विनोदी लेखक प्रसंगातून विनोद निर्मिती करीत. पण पुलंनी शब्दचमत्कृती मधून विनोद निर्मिती केली. म्हणून पुलंचा विनोद हा अधिक लोकांना सहजतेने कळला आणि अधिक खळखळून हसवून गेला. त्या विनोदात भोवतालच्या परिस्थितीची जाणीव आहे. काहींना वाटत पुलं अचानक दुःखांत करतात. तो अचानक ओढूनताणून केलेला दुःखांत नसतो. ते कारुण्य त्यांच्या लिखाणातलाच धागा होऊन येते आणि अचानक चमकून जाते. खूप हसवताना अंतर्मुख करते. पुलंना लोकांना हसवायला कमरेखालचे बिभित्स विनोद करावे लागले नाहीत की कोणाची निर्भत्सना करावी लागली नाही. आजकाल रोस्ट कॉमेडी हा प्रकार लोकप्रिय होऊ लागलेला आहे. त्या विनोदामधला बिभित्सपणा भयावह आहे. इंटरनेट आणि टीव्हीने नैतिकतेचे निकष खूप खाली आणून ठेवलेत. सेक्स आणि हिंसेचा मारा सतत वेगवेगळ्या माध्यमातून लोकांवर होत असतो. याच्यामुळे बिघडत काही नाही. फक्त आपले कानाचे आणि मनाचे पडदे दगडी बनत जातात आणि हळूहळू आपण असंवेदनशील बनत जातो. इंटरनेटवरचे ट्रोल एखाद्या व्यक्तीला किती मानसिक त्रास देत असतील याचा आपण विचार करत नाही. किंवा चाईल्ड पॉर्न बघण्यामागची विकृती कळत नाही. लोकांचे टीव्हीवर मुडदे पडत असताना पापणी लावत नाही. आणि यावर उपाय काय ? अजून भयानक बघा. अधिक हिंसा. अधिक सेक्स...
पुलं म्हणत, विनोदी लेखकाने हजामसारखं असावं. ज्याची हजामत होतेय त्याच रक्त काढू नये. हजामत होतेय त्याला नंतर निर्मळ वाटावं. आणि खरंच पुलंचा विनोद खूप निर्मळ आहे.लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना हसवणारी. आणि हसवता हसवता आपल्यातील व्यंग दाखवणारा.
पुलंना केवळ विनोदी लेखक मानणाऱ्या लोकांची मला खरंच कीव येते. त्यांनी पुलंची दोन चार प्रसिद्ध पुस्तकं सोडून बाकी काहीही वाचलेलं नाही हे कळतं. किती समृद्ध लिखाण आहे त्यांचं .
पुलं हे उत्तम भाषांतरकार होते. त्यांनी अनेक पुस्तके अनुवादित केली आहेत. उदाहरणार्थ हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अँड द सी चे भाषांतर म्हणजे एका कोळियाने, शॉच्या माय फेअर लेडीचे भाषांतर म्हणजे ती फुलराणी. नावापासूनच ती पुस्तके मराठी वाटू लागतात. ती पुस्तके भाषांतरित न वाटता स्वयंभू कलाकृती वाटतात. त्यात शब्दांची ओढाताण जाणवत नाही. त्यातली पात्रे मराठीपण घेऊन येतात. किती लेखकांना ही किमया साधली आहे बरे? वि वा शिरवाडकर सोडता दुसरे नाव समोर येत नाही.
व्यक्ती चित्रण हा पुलंचा आणखी एक आवडता प्रकार. दाद, आपुलकी, गुण गाईन आवडी, गणगोत अशा अनेक पुस्तकात त्यांनी त्यांना भेटलेल्या आणि न भेटलेल्या लहान मोठ्या व्यक्तींचे व्यक्तिचित्रण केले आहे. त्यात अडीच वर्षाचा दिनेश आहे. त्यांची आजी आहे.गदिमा आहेत.बालगंधर्व आहेत. राम गणेश गडकरी आहेत. लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, रावसाहेब, वसंतराव देशपांडे आणि अनेक दिग्गज मंडळी आहेत. हे फक्त या व्यक्तींचं व्यक्तिचित्रण नाही. यांचं व्यक्तिचित्रण करताना नकळत पुलंनी त्यांचं आत्मचरित्र तुकड्यातुकड्यातुन मांडलं आहे. ही पुस्तके वाचताना मला जाणवलं की पुलंना कवितेची किती जबरदस्त समज होती आणि आवडही. पुलंना गाण्याची सुद्धा किती सूक्ष्म समज होती. त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकाराने आयुष्याला आलिंगन दिलं. ते किती खऱ्या अर्थाने आनंदयात्री होते. मला त्यांच्या पुस्तकातून गडकरी अधिक कळले. सुरेश भट हे मोठे कवी आहेत हे आधीच माहित होतं. पण पुलंच्या पुस्तकातून कळलं सुरेश भट इतके मोठे
"का"
आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकाची पारायणे आधीच झाली होती. पण इतिहास हा इतका का महत्त्वाचा हे पुलंनी सांगितलं.
पुलंची प्रवासवर्णनं अचाट आहेत. अपूर्वाई , पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा या पुस्तकांची मी एकाकाळी पारायणं केली आहेत. ते देश पुलंच्या नजरेने मी आधीच फिरून आलीय. मी जर कधी लंडनला गेले तर मी नक्की कार्लाइलच घर बघायला जाईन. मी त्यांचं एकही पुस्तकं वाचलेलं नाही. पण पुलंनी अपूर्वाई मध्ये वर्णन केलंय न.. मग मला बघायचंय. मी जर कधी बालीला गेले तर पुलंना भेटलेला वाटाड्या
"मुख"
मलाही भेटेल असं वाटत. जपानी आजीबाईंचा तो चहा प्यायला मला सुद्धा निक्कोला जावंस वाटत. आणि केक्को म्हणावसं वाटत. इटलीला गेले तर काप्री बघायचंय. आणि तिथली
"निळाई"
अनुभवायचीय. मला ती ठिकाणं पुलंना दिसली तशी नक्कीच दिसणार नाहीत. पण तरी पुलं तिथे कधी तरी येऊन गेले होते. आणि आज मी सुद्धा तिथेच आहे हा दुवा मला त्या ठिकाणांच्या अधिक जवळ नेईल असं वाटत.
मला त्यांची नाटकं आवडतात. पण अस्वस्थ करतात. त्यांच्या नाटकांचा शेवट मला संभ्रमात टाकतो. असं वाटत काहीतरी बाकी आहे. अधुरं आहे. पण ते अधुरेपण असं का बरे मोहक वाटते. पुढे काय झालं असेल याची उत्सुकता चाळवत राहते. मी माझ्या मनाने त्या नाटकांचा शेवट पुरा करू पाहते.
पुलं हे किती छान
performer होते. त्यांचे निवडक पुलं हे अभिवाचनाचे कार्यक्रम किती जिवंत आहेत.
stand up कॉमेडी हा शब्दही अस्तित्वात नव्हता तेव्हा ते बटाट्याच्या चाळीचे प्रयोग करत होते. ते स्वतःला बहुरूपी म्हणत. आणि ते होतेच. नाटकंकार , अनुवादक, संगीत दिग्दर्शक, नट , गायक, खवय्ये, विनोदी लेखक, एकपात्री कलाकार, ललित लेखक अशी एकाच माणसाची विविध रूपे. प्रत्येक रूप तितकंच मोहवणार. उगीच ते महाराष्ट्राचे लाडके झाले नाहीत.
पुलंच्या पुस्तकात आलेले संदर्भ प्रत्यक्ष भेटतात तेव्हा मला कोण आनंद होतो. त्यांच्या पुस्तकात असलेली मामा काणेंची खानावळ, सायनचे मणीज , इस्माईल कॉलेज, सावंतवाडीची बटर बिस्कुटे या गोष्टी मला अचानक सापडल्या तेव्हा मी खूप खुश झालेले. या आनंदाचं कारण काय? मला तरी नीट नाही सांगता येत.
त्यांच्या लिखाणाने शिकवलं , कठीणात कठीण परिस्थिती मध्ये सुद्धा हसता येत. आपल्या फजितीवर आपलं आपणही हसता येत. जेव्हा जेव्हा मला खूप एकटं वाटत, खूप उदास वाटतं तेव्हा पुलंच्या पुस्तकांची सोबत असते. कधी ती पुस्तके मला कधी एडिंबराला घेऊन जातात, कधी झिम्मा खेळणाऱ्या आम्रराजाची गम्मत सांगतात, कधी एक शून्य मी म्हणत अंतर्मुख करतात, कधी बेगम अख्तर, माणिक वर्मा यांचं गाणं ऐकायला मजबूर करतात, कधी त्यांच्यासोबत मॉन्जिनीमध्ये नेतात आणि कधीतरी झालेली आपली फजिती आठवून देतात. पुलंच्या सखाराम गटणे प्रमाणे सानेगुरुजी आणि पुलं हे माझे आवडते लेखक आहेत. सानेगुरुजींनी मला नैतिकता शिकवली, संवेदनशीलता शिकवली. आणि पुलंनी यातला मझा शिकवला. माझं आणि करोडो मराठी भाषिकांचं आयुष्य खूप खूप समृद्ध केलात तुम्ही पुलं. खूप खूप धन्यवाद.
Excellent!
ReplyDeleteअप्रतिम.....!
Thanks
Delete